-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Sunday, August 12, 2018

दि.११ जुलै २०१८ रोजी दैनिक 'लोकसत्ता'च्या 'प्रयोगशाळा' सदरात स्वातीताई केतकर यांनी माझ्या कामाविषयी लिहिलेला लेख.

इंग्रजीचा कानमंत्र

सुरुवातीला शाळेविषयी वस्तीत काही फारसे ममत्व नव्हते.

|| स्वाती केतकर- पंडित
औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भानुसे वस्ती यांची पटसंख्या कमी असेल पण इथल्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीविषयक आत्मविश्वास मात्र जबरदस्त आहे. तो वाढवण्यास कारण आहेत त्यांचे प्रयोगशील शिक्षक, गजानन बोढेअनेकदा आपण ‘फाड फाड इंग्लिश बोलायला शिकवण्या’चे आश्वासन देणाऱ्या जाहिराती पाहतो आणि हसून विषय सोडून देतो. पण जि.प. शाळेतल्या एका शिक्षकाने अगदी खेडय़ातील मुलांना घेऊन हा प्रयोग खरंच यशस्वी करून दाखवला आहे, त्यांचे नाव आहे, गजानन बोढे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भानुसे वस्ती, तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद इथे गजानन शिक्षक म्हणून काम करतात. त्यांना शिक्षक बनण्याची ओढ लहानपणापासूनच होती. शिवाय घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या वेळी केवळ डीएड करणेच शक्य होते. पण गजाननना कधीच नुसता मास्तुऱ्याह्ण बनून राहायचे नव्हते. त्यांना एक उत्तम शिक्षक बनायचे होते. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे होते. डीएड झाल्यावर लगेच काही नोकरी चालून आली नाही. मग सुरुवातीला खासगी शिकवण्या घेतल्या. एटापल्लीसारख्या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी आश्रमशाळेत त्यांनी काम केले आणि सरतेशेवटी जि.प. शाळेमध्ये त्यांची नेमणूक झाली. ही शाळा सिल्लोड तालुक्यापासून सुमारे २५ किमीवर आहे. पण दुर्गम भागात. टाकळी जिवरग गावाचा एक भाग म्हणजे भानुसे वस्ती. गावापासून तीन किमीवर शेतामध्ये ही वस्ती आहे. जवळपास ५१ घरांच्या या वस्तीची ही वस्तीशाळा म्हणजे गजाननची कर्मभूमी. शाळेला इमारत आहे, पण तिथे पोहोचण्यासाठी रस्ता नाही. मुख्य रस्त्यापासून दीड किमी आत चालत जावे लागते. सध्या यातल्या अध्र्या रस्त्याला डांबरीकरण झालेले आहे. उर्वरीत रस्ता मात्र अजूनही  प्रतीक्षेत आहे.
सुरुवातीला शाळेविषयी वस्तीत काही फारसे ममत्व नव्हते. पहिल्या वर्षी तर शाळेचा पट होता, २६. हळूहळू गजाननचा जम बसू लागला. इथल्या थोडक्या चिल्ल्यापिल्ल्यांत त्यांना शिक्षणाचा सूर गवसू लागला. इतक्यातच २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांत एक नवे आव्हान समोर आले. त्या वर्षीच्या जूनमध्ये वस्तीत पहिलीतील प्रवेशयोग्य मुले होती आठ, पण गजाननच्या शाळेत प्रवेश घेतला फक्त दोघांनी. कारण काय तर दूरवर असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा. ही गोष्ट गजाननच्या मनाला फार लागली. त्यांनी आपल्याकडच्या या दोनच विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी शिकवण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी १५ ऑगस्टची मर्यादा आखून घेतली. या दिवशी झेंडावंदनासाठी सारी वस्ती शाळेत यायची. अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांना सोपे इंग्रजी शब्द गजानननी शिकवले.  पुढच्या इयत्तेतील मुलांना छोटी वाक्ये, वाक्य समूह, शुभेच्छा आणि सरतेशेवटी   मोठय़ा मुलांना तर चक्क संभाषण शिकवले. हे सगळे विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्टच्या दिवशी सादर केले. आता हे सगळे करण्यासाठी जादूची छडी तर नक्कीच नव्हती. उलट छडीऐवजी गोड बोलणे, कधी चॉकलेट्स, गोळ्यांचा खाऊ तर कधी गमतीदार खेळ याची मदत गजानननी घेतली.
फोनिक पद्धतीची माहिती करून घेत, गजानननी विद्यार्थ्यांना वाचायला शिकवले. लिखाणाआधीसुद्धा त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शब्दांची ओळख करून दिली. मुळात अशा प्रकारच्या झटपट इंग्रजी संभाषणासाठी त्यांनी उच्चाराप्रमाणे अक्षरगट तयार केले, त्यावर अनेक प्रयोग करून ते विद्यार्थ्यांच्या तोंडी रुळवले. अक्षरांच्या ध्वनींची ओळख झाल्यावर विद्यार्थ्यांना ही अक्षरे, उच्चार परके राहिले नाहीत त्यामुळे त्यांनीही गजानन सरांच्या मागोमाग ते तसेच्या तसे आत्मसात केले. अर्थात ही सगळी प्रक्रिया सोपी नव्हती. यासाठी मुळात गजानननी ३००-४०० शब्दांची पत्रके तयार केली. यातील काही शासनाने दिलेली होती पण त्यामध्ये अनेक शब्द नसल्याने गजानननी स्वत:च हाती काही पत्रके तयार केली. जवळपास ३००-४०० शब्दांची मिळून पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स तयार केली. यामध्ये प्रथम एखादा उच्चार, शब्द, त्याच्याशी यमक जुळणारा शब्द अशा क्रमाने शब्द येत आणि ध्वनीओळख पक्की होई. उदा. अ‍ॅ या उच्चाराच्या जोडीला येई, अ‍ॅट, कॅट, बॅट इ. सगळा जून महिना अशाच प्रकारे तयारीत गेल्यावर जुलैमध्येच गजानननी पाठय़पुस्तक उघडले. आता पुस्तकामध्ये दिसणारे शब्द विद्यार्थ्यांसाठी अनोळखी नव्हते. त्यामुळे पाठय़पुस्तक हा आपल्याला माहिती असणारा शब्द शोधण्याचा खजिनाच झाला. अर्थातच या पुस्तकाचे विद्यार्थ्यांकडून प्रेमाने स्वागत झाले. पुढे गजानननी अक्षरसमूहांचे क्लस्टर तयार केले. त्यावरही पीपीटी तयार केल्या. याचसोबत वर्डबोर्ड नावाचा एक उपक्रम घेतला. त्यात न वाचलेल्या शब्दांचा तक्ता तयार केलेला होता. या सगळ्याच्या मदतीनेच १५ ऑगस्टला त्यांच्या विद्यार्थ्यांनी शाळेसमोर आणि वस्तीसमोर छान इंग्रजी बोलून दाखवले आणि याचा परिणाम म्हणून पालकांनी इंग्रजी शाळेतून काढून विद्यार्थ्यांना परत एकदा जि.प.च्या मराठी शाळेत घातले. गजानन पहिली लढाई जिंकले होते. त्यांचा उत्साह आणखीच वाढला होता. पण त्यांना कळून चुकले की, तथाकथित ‘विंग्रजी’ माध्यमाची पालकांवर पडलेली भुरळ मोठी आहे. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. मग आपल्या शाळेतले विद्यार्थीही इंग्रजीत मागे राहू नयेत, यासाठी गजानननी अधिक मेहनत घ्यायला सुरुवात केली. अर्थातच हे उपक्रम विद्यार्थ्यांना भरडणारे नाहीत तर हसतखेळत अभ्यास करून घेणारे आहेत. म्हणजे घसरगुंडीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त एकच अट असते, अप अप म्हणत वर जायचे आणि डाऊन डाऊन करत खाली घसरत जायचे. ही अट कंटाळवाणी तर मुळीच नाही, उलट धम्माल आणणारी वाटते. सुरुवातीला नुसता काहीतरी उच्चार म्हणून येणारा अपह्ण पुढे वर्गात शब्द म्हणून भेटल्यावर त्याचा अर्थ लागतो आणि  घसरगुंडीचा साधासा खेळही एकदम रंजक आणि माहितीपूर्ण बनून जातो. हीच गोष्ट इतर कृतींची. लहानग्यांना पाण्यात खेळणे म्हणजे भलतेच आवडीचे. म्हणून हे क्रियापद शिकवण्यासाठी गजानननी त्या तासाला विद्यार्थ्यांना बादलीतून थोडय़ाशा पाण्यात हातच धुवायला लावले. या धम्माल शिकवण्यामुळे क्रिया सांगणारे पद ही क्रियापदाची खरी ओळख विद्यार्थ्यांच्या मनात पक्की बसली.
इंग्रजीसोबतच गजानन गणिताविषयीही बरेच काम करत असतात. त्यांच्या भाषेत प्रयत्न चालू असतात. ते म्हणतात, कुमठे बीटला गेलो असताना, शिक्षणविषयक एक नवीन जाणीव मिळाली. तेथे फरशीवरही काही आरेखने काढलेली होती. ज्यांचा सर्वच विषयांसाठी उपयोग होत होता. ती पाहिल्यापासून मीही ठरवले की असे काही आपल्या शाळेत असावे. ते प्रत्यक्षातही आणले. संख्या, गणिती क्रिया, १+१=२ असे नुसते कोरडे न शिकवता याच्या जोडीला स्ट्रॉचे तुकडे, चिंचोके अशा प्रत्यक्ष वस्तूंचे गट आणले. मग संख्येचे स्थान, त्यावरून त्याची किंमत आणि संख्यागटाचे स्थान त्यावरून त्याची किंमत असा प्रवास सुरू झाला.
या सगळ्या उपक्रमांची दखल घेतली जाऊन यंदाच्या पहिलीच्या पाठय़क्रमाच्या निर्मितीमध्ये गजानन यांनाही खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली. इंग्रजी भाषेच्या अभ्यास मंडळाचे एक सदस्य म्हणून त्यांना आपला अनुभव आणि विचार मांडण्याची संधी मिळाली. ज्यासाठी राज्यभरातून केवळ १६ शिक्षक निवडले गेले होते. याचप्रमाणे वस्तीवरही गजानन सरांच्या प्रयत्नांना आता दाद मिळू लागली आहे. आपल्या मुलांची सरांमुळे होत असलेली प्रगती पाहून पालकांनीही लोकसहभागातून वर्गणी काढून शाळेला प्रोजेक्टर दिला आहे. आपली मुले याच शाळेत जावीत, असा विश्वास त्यांना वाटू लागला आहे. हा विश्वास तयार करणे, हेच गजाननचे ध्येय होते आणि यशही आहे.

No comments:

Post a Comment

आपला अभिप्राय लिहा...