-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Sunday, August 6, 2017

दि.२१/०३/२०१६ रोजीची प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शेजारील तालुक्याच्या शिक्षकांची शाळाभेट

दि.२१/०३/२०१६ रोजी फुलंब्री तालुक्यातील विविध जि प शाळांमधील ०८ शिक्षकांनी माझ्या शाळेस भेट दिली.
सर्वजण अपरिचित त्यातल्या त्यात तालुक्याबाहेरील शिक्षकांनी माझ्या शाळेला भेट देणे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता.
माझ्या शाळेला भेट देण्यासाठी सोयगाव/फुलंब्री तालुक्यातील काही शिक्षक येणार असल्याचे मा.गाडेकर साहेबांकडून जेव्हा मला कळाले तेव्हा जरा या अनपेक्षित धक्क्याने पुरता गोंधळून गेलो होतो.
कारण नवोपक्रमशील/रचनावादी शाळांच्या भेटीच्या नियोजनात जिल्हा शिक्षण विभागाकडून अंतिम करण्यात आलेल्या यादीत माझ्या शाळेचे नाव असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.
कसे होईल,येणारी मंडळी कोणत्या व किती अपेक्षा बाळगून येतील हे सारं अज्ञात होतं.
ज्या शाळा/केंद्र/बीट १००% प्रगत झाल्यात किंवा ज्यांनी तसे घोषित केले होते अशाच शाळा/केंद्र/बीटांना भेटी देण्याचे नियोजन असावे अशीच माझी समज होती.
मी कधीच माझी शाळा १००% प्रगत झाल्याचा दावा वा घोषणा केलेली नव्हती (त्यादृष्टीने प्रयत्न मात्र सुरु आहेत...प्रयत्नांना यश येईलही असा विश्वास वाटतो पण किती कालावधीत हे यश पदरी पडेल हे मात्र निश्चितपणे आता सांगता येऊ शकणार नाही..)
त्यामुळे माझ्या शाळेचे नाव यादीत येईल असे वाटले नव्हते.
पण जेव्हा मी नियोजन यादी बघितली तेव्हा त्यात माझ्या शाळेचे नाव बघून आश्चर्यच वाटले.विश्वासच बसत नव्हता माझा यावर..असो!
तरीही या अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जाण्याचे ठरवून घेतले...(त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हताच.)
पूर्वानुभव नसल्याने गोंधळलेल्या मनस्थितीतच काल रविवार असूनही शाळेत गेलो.
त्यासाठी शनिवारी रात्रीच ४ थीत शिकणाऱ्या रवी व रोहनला (जे वस्तीच्या दोन विरुद्ध टोकांना राहतात) त्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व सांगितले कि आपल्या शाळेवर सोमवारी (२१ मार्च २०१६) दुसऱ्या तालुक्यातून काही शिक्षक तुमचे आतापर्यंतचे शिकणे समजून घेऊन तुमचे कौतुक करण्यासाठी येणार आहेत.
तुमच्या घराजवळील मित्र-मैत्रिणींनाही सांग कि बोढे सर रविवारी वर्ग घेणार आहेत म्हणून..!
रोहन , रवीने जो प्रतिसाद मला फोनवर दिला ते ऐकून माझी मानसिक गोंधळावस्था निवळली...जरा relax feel करू लागलो.कारणही तसेच होते.
ते दोघेही म्हणालेत,"सर,तुम्ही आम्हाला good news दिलीत... आम्ही तयार आहोत..उद्या (रविवारी,२० मार्च २०१६) सर्वांना घेऊन शाळेत येतो...!"
त्यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता.त्यामुळे माझ्या मनातील अस्वस्थता कमी झाली.
ठरल्याप्रमाणे रवी व रोहनने वस्तीतील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत रविवारच्या वर्गाचा निरोप पोहचवला.
एकूण २८ पैकी २३ विद्यार्थी रविवारच्या वर्गाला हजर राहिले.
सर्वांना सोमवारी शाळेस भेट देण्यास येणारे पाहुणे कोणकोणते प्रश्न विचारू शकतील याची कल्पना दिली.
त्यादृष्टीने तयारी करून घेतली.
आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण शिकलोत त्याचे सादरीकरण स्वतः विद्यार्थ्यांना उपस्थितांसमोर करता यावे यादिशेने मुलांना मार्गदर्शन केले.
शिकलेल्या भागाची उजळणी करून घेतली..पुरेसा सराव झाल्याची खातरजमा झाली व रविवारचा हा विशेष वर्ग संपला.
आज सोमवार उजाडला... आज २८ पैकी २६ मुले उपस्थित होती.
कार्तिक हा इयत्ता २ री तील विद्यार्थी त्याच्या मामाच्या लग्नासाठी म्हणून मागील तीन दिवसांपासून गेलेला होता.त्याचीच इयत्ता ४ थीत शिकत असलेली बहीण रुपाली आज बाहेरील पाहुणे शाळाभेटीसाठी येणार असे कळल्याने तिच्या आजीसोबत मामाच्या गावाहून परतली होती.कार्तिक मात्र त्याच्या मम्मी-पप्पांसोबत तिकडेच राहिलेला होता.
पण आश्चर्य असे कि त्याला राहवले नसावे...तो त्याच्या पप्पांसोबत उशिरा शाळेत हजर झाला.
त्याचे पप्पा सांगत होते कि शाळा बुडते,अभ्यास मागे राहतो म्हणून तो रडायला लागला व शाळेत पोहचवून द्या म्हणून जिद्द करू लागला..त्यामुळे तडकाफडकी तयारी करून त्याच्या जिद्दीपोटी आम्ही गावाहून परतलो.
हे ऐकून मनोमन मी सुखावलो.
विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयीची आवड/ओढ निर्माण झाल्याचे बघून कोणत्या गुरुजींना आंनद होणार नाही.?
आपण करत असलेल्या कामाचं ते सुखद फलित असल्याची ही अनुभूती होती.
ग्रेट मुलांनो ग्रेट!!!
नियोजनाप्रमाणे आमच्या केंद्रप्रमुख आदरणीय भडिकर मॅडम शाळेत आधीच उपस्थित झालेल्या होत्या.
Projector screen वर इंग्रजी शब्दवाचनाची ppt सुरू होती..मुलं शब्द वाचत होती...दरम्यान ११.०० वाजता शाळेत फुलंब्री तालुक्यातील ०८ पाहुण्यांचे आगमन झाले.सोबत केंद्रीय मुख्याध्यापक मा.पवार सरदेखील होते.
"Welcomes all of you..." असे सर्व विद्यार्थ्यांनी एकसुरात म्हणत पाहुण्यांचे स्वागत केले.
सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती केली..व शाळेतील उपक्रमांचे सादरीकरण प्रत्यक्ष मुलांच्या कृतियुक्त सहभागाच्या आधारे प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांसमोर केले.
सुरुवात इंग्रजी विषयाच्या सादरीकरणाने झाली.
Ppt त संग्रहित केलेले शब्द माझ्या मदतीशिवाय इयत्ता १ली व २रीची मुले स्वतःच सहज कशी वाचतात हे उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभवले.
टाळ्या वाजवून मुलांचे साऱ्यांनी कौतुक केले.
त्यानंतर ३ ते ५ वी तील मुले त्यांनी शिकलेल्या english sentence constructions च्या मदतीने वाक्यनिर्मिती कशी करतात ते अनुभवले.
नमुन्यादाखल काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विशिष्ट construction मध्ये वाक्य तयार करून सांगितले तर काही विद्यार्थ्यांनी त्याच वाक्याचे दुसऱ्या construction form मध्ये वाक्याचे अर्थासह रूपांतरण करून दाखवले..पुन्हा टाळ्या वाजवून माझ्या चिमुकल्यांचे कौतुक उपस्थितांनी केले...खूप बरे वाटले.
त्यानंतर
इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांनी One digit number पासून Nine digit numbers पर्यंतचे अंककार्डाच्या व फरशिवरील रेखाटनाच्या मदतीने वाचन करून दाखवले.
पुढे दिलेल्या number मधील प्रत्येक digits च्या place values मुलांनी लिहून दाखवल्या...दिलेल्या numbers चे expanded form लिहून दाखवले... दिलेल्या दोन numbers मध्ये comparison करून विविध चिन्हांचा (less than, greater than, is equal to..) वापर करून वाचन करून दाखवले.
Additions,subtractionsची उदाहरणे विविध प्रतिकांचा उपयोग करून सोडवून दाखवलीत.
विशेष म्हणजे दशकोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन,expanded forms, comparisons,Additions with carrying over तथा without carrying over इत्यादी घटकांचे प्रात्यक्षिक १ लीतील चिमुकल्यांनी करून दाखवत उपस्थितांची मने जिंकली... टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी माझ्या शाळेतील लेकरांचं
कौतुक केलं.
३ री,४ थी व ५ वीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांनी दिलेल्या तीन शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून सादरीकरण केले.
"देव दगडात नसून माणसात असतो"...हा गाडगेबाबांचा संदेश देणारे नाट्यीकरण ४ थी ५ वीतील रोहन,रवी,दिवेश सौरभ,विशाल या चिमुकल्यांनी करून दाखवले.
.......................................
एकंदरीत गुणवत्ता उत्तम असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.
पण तरीही ०५ मुलांनी अद्याप अपेक्षित क्षमता प्राप्त केलेल्या नाहीत...पैकी ०३ मुलं हळूहळू प्रगती करत आहेत...०२ मुलांवर विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे....तेही शिकु शकतील हा विश्वास आहे...प्रत्येक मूल शिकु शकतं हे समजायला लागलंय स्वानुभवातून...पण त्यासाठी पुरेसा अवधी हवाय अन् शासन प्रशासनाने तितका अवधी द्यावा ही रास्त अपेक्षा आहे...कारण प्रत्येकाची शिकण्याची गती भिन्न असते हे वास्तव नाकारून चालणार नाही.
जोपर्यंत ही ०५ मुलं त्या त्या वर्गाच्या अपेक्षित किमान अध्ययन क्षमता प्राप्त करणार नाहीत तोपर्यंत मलाही परिपूर्ण समाधान लाभणार नाही...अन् मीदेखील समाधानी नाहीय.
आजवर एकूण पटापैकी २-४ मुलं 'अप्रगत' असली तरी एकंदरीत शाळेची गुणवत्ता उत्तम असल्याचे समाधान वाटायचे पण आज मात्र भावना याउलट आहेत....
जोपर्यंत ही ०५ मुले पूर्णतः शिकती होणार नाहीत तोपर्यंत माझ्या मनाची अस्वस्थता एक शिक्षक/सुलभक म्हणून संपणार नाही हे इथे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.
अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे ही माझी वृत्ती नाही..
'चट मंगनी पट ब्याह...' या उक्तीप्रमाणेच
'चट उपक्रम पट गुणवत्ता' हेही शक्य नाही.
कामाची चांगली सुरुवात झालीय हे खरंय पण अजून खूप करायचे बाकी आहे याचीही नम्र जाणीव आहे.
पुन्हा एकदा इथे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते,
माझी शाळा
१००℅ 'प्रगत' झालेली नाही.
पण त्यादिशेने प्रयत्न सुरू आहेत...सुरू राहतील हे मात्र निश्चित.
आजच्या सादरीकरणात सहभागी झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा नामोल्लेख इथे करायचा राहून गेलाय.
एकंदरीत मुलं त्यांच्या त्यांच्या गतीने शिकत आहेत...त्यांना शिकताना बघून आम्ही गुरुजी आंनद घेत आहोत.
.......................................

No comments:

Post a Comment

आपला अभिप्राय लिहा...