-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Sunday, August 6, 2017

सहज शाळाभेटीदरम्यान आलेल्या पाहुण्यांकडून झाले कौतुक लेकरांच्या शिकण्याचे!

(पुढील पोस्ट २६ मार्च २०१६ रोजी माझ्या जुन्या ब्लॉगवर प्रसारित केलेली होती.)



गत दोन दिवसांपूर्वी आमच्याच केंद्रातल्या एका शाळेतील सहशिक्षिका मुलांचे आतापर्यंतचे शिकणे समजून घेण्यासाठी माझ्या शाळेत आल्या होत्या. योगायोगाने विठ्ठलभाऊ (विठ्ठलराव वहाटुळे...वस्तीतील एक प्रतिष्ठित नागरिक) शाळेत काही कामानिमित्त आलेले. त्यावेळी आतापर्यंत मुलं जे काही शिकलीत त्याचे प्रात्यक्षिक मुलांच्या कृतियुक्त सहभागातून मी शाळाभेटीला आलेल्या त्या मॅडमना दाखवत होतो. विठ्ठलभाऊ कुतूहलाने हे सारं बघत होते. इयत्ता १ ली ची मुलं दशकोटीपर्यंतच्या संख्या सहज वाचत होती.. इतकेच नाही तर दिलेल्या कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकांच्या स्थानिक किंमती सांगणे व लिहिणे. विस्तारित रूपात संख्येची मांडणी करणे.. दिलेल्या दोन संख्यांमध्ये तुलना करून लहानमोठेपणा ठरवणे. योग्य संकेतचिन्हे वापरून संख्यामध्ये केलेली तुलना वाचून दाखवणे. हातच्याची व बिनहातच्याची बेरीज व वजाबाकी करणे. दिलेल्या संख्येच्या मागची व पुढची संख्या अचूक सांगता येणे. चढता उतरता क्रम. संख्यांची कहाणी तयार करणे. इत्यादी कृती मुलं सहज व सफाईदारपणे करत होती. हे सारं बघून विठ्ठलभाऊ प्रभावित झाल्याचे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव सहज उमटून दिसत होते. अशाप्रकारे आपल्या व्यस्त दिनचर्येतून सवड काढत कधी नव्हे ते त्यादिवशी माझ्या शाळेत तब्बल एक तास बसून आमच्या विद्यार्थ्यांचे शिकणे त्यांनी अनुभवले. शाळाभेटीला आलेल्या मॅडमसह विठ्ठलभाऊंनीदेखील मुलांचे व आम्हा गुरुजींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● या पार्श्वभूमीवरच आजचा प्रसंग इथे share करावासा वाटतोय. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●सध्या सकाळ पाळीत शाळा सुरू आहेत. नेहमीप्रमाणे आज १२.३० वाजता शाळा बंद करून मुलं आणि आम्ही दोन्ही शिक्षक घरी जायला निघालो.दुचाकीवर बसलो देखील..(आम्ही निघेपर्यंत एकही विद्यार्थी घरी जात नाही..निघताना bye करण्याची सवय मुलांना लागलेलीय..त्यामुळे सर्वजण आम्ही निघण्याची वाट पाहत शाळेच्या आवारातच थांबलेली होती.) तितक्यात वर ज्यांचा उल्लेख केलाय ते विठ्ठलभाऊ वहाटुळे एका पाहुण्याला सोबत घेऊन शाळेच्या आवारात आले व म्हणाले, "आमच्या पाहुण्याला आपल्या शाळेत चाललेला कार्यक्रम दाखवा बरं सर..!" (मुलांच्या सुलभ शिकण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या आमच्या कामाचा उल्लेख विठ्ठलभाऊंनी 'कार्यक्रम' असा केलेलाय...) अण्णासाहेब फुके असे त्या पाहुण्याचे नाव असून मूळ गाव टाकळी. (माझ्या शाळेची वस्ती टाकळी गावाचाच भाग). औरंगाबाद येथील एका खासगी माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. विठ्ठलभाऊंच्या म्हणण्याला प्रतिसाद देत आम्ही दोन्ही गुरूजी बसल्या गाडीवरून उतरलो अन् पोरांना वर्गाची दारे उघडायला सांगितली. पोरंही जाम खुश होती...(जिल्हा नियोजनानुसार गत सोमवारी शेजारील तालुक्याच्या शिक्षकांनी केलेल्या शाळाभेटीच्या पार्श्वभूमीवर मुलांना मी तसे सांगूनच ठेवलेलेय कि यापुढे तुमचे शिकणे बघण्यासाठी कोणीही कधीही येऊ शकेल..तेव्हा तुम्ही या साऱ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरं जायला हवं... त्यामुळेही मुलांना आंनद झालेला असावा कदाचित..असो!) दोन दिवसांपूर्वी मुलांनी आतापर्यंत शिकलेल्या ज्या ज्या बाबींचे सादरीकरण शाळाभेटीला आलेल्या मॅडमसमोर केले होते त्याच बाबी आज आलेल्या पाहुण्यासमोरही (अण्णासाहेब फुके सरांसमोर) केले. आत्मविश्वासाने मुलांनी आतापर्यंत शिकलेल्या सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडल्या. हे सारं पाहून अण्णासाहेब फुके सर अचंभित झाले व मुलांचे कौतुक म्हणून खूष होऊन १०० रुपयांची नोट माझ्या हाती त्यांनी टेकवली आणि म्हणाले, "मुलांसाठी माझ्याकडून उद्या खाऊ घेऊन या..!" मुलांना मी ती नोट दाखवून म्हटले, "या सरांनी दिलेल्या या १०० रुपयातुन तुमच्यासाठी काय आणू...?" मुलं म्हणालीत, "सर,आम्हाला नकोत ते पैसे..आम्हाला खाऊदेखील नकोय..!" "मग काय करू या पैशाचं तुम्हीच सांगा..!" ....मुलांना मी केलेला प्रश्न. "सर,तुम्ही रविवारच्या वर्गाला येताना गाडीत पेट्रोल टाकून आणा...!" -मुलांचा प्रतिसाद. .....गेल्या काही दिवसांपासून मी रविवारी वर्ग घेतोय याची जाणीव मुलांना असल्याचे पाहून बरे वाटले...रविवारी वर्ग घेतोय म्हणून त्यासाठी येणारा गाडीचा पेट्रोल खर्च मुलांच्या कौतुकापोटी कोणी दिलेल्या रकमेतुन निश्चितच मी करणार नाही...मीच काय काम करणारा कोणताच गुरूजी असा विचार कदापि करणार नाही. आतापर्यंत माझ्या सवडीप्रमाणे ज्या ज्या रविवारी वर्ग घेतलेले आहेत त्या त्या प्रत्येक रविवारी मुलं आंनदाने हजर राहताहेत...मी दिलेल्या वेळेआधीच मुलं शाळेच्या आवारात येऊन राहतात. माझ्या लहानपणीही माझे प्राथमिक शाळेतले गुरुजी रविवारी तसेच दिवाळीच्या सुट्टयांतदेखील वर्ग घेत असल्याचे आठवतेय...पण त्या वर्गांना उपस्थित राहण्याची सक्ती व धाक असायचा...इच्छा असो वा नसो हजर राहावंच लागायचं...कारण नाही उपस्थित राहिलं वर्गाला कि हातावर वळ उमटेपर्यंत 'रूळ' बसायचे हमखास... शिक्षेच्या भीतीपोटी/शिक्षा टाळण्यासाठी नाईलाजाने सुट्टीच्या दिवशीचे वर्ग करत होते बहुतांश विद्यार्थी. ...पण माझ्या विद्यार्थ्याना आंनद वाटतोय सुट्टीच्या दिवशीही शाळेत येण्याचा...! कोणताही धाक नाही कि सक्ती नाही...! यालाच शाळेविषयीची आवड किंवा ओढ म्हणत असावे कदाचित... नाही का..? feeling very happy & proud with my students...󾌵...

No comments:

Post a Comment

आपला अभिप्राय लिहा...